नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात उद्या रविवारी (१२ मे) रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी मार्लेना, राघव चढ्ढा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील सर्व १० , बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार आहे. या ५९ मतदारसंघांमध्ये एकूण ९७९ उमेदवार रिंगणात असून, तेथील १ लाख १३ हजार १६७ मतदान केंद्रांवर सुमारे १० कोटी १८ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.गेल्या निवडणुकीत या ५९ पैकी ४४ जागा भाजपने, तर दोन जागा त्याच्या मित्रपक्षाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला होता, तर तृणमूल काँग्रेसनने ८, भारतीय राष्ट्रीय लोकदलाने २ व समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती.
गेल्या वेळी जिंकलेल्या ४४ जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. या मतदारसंघातील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तसेच सप-बसप आघाडीचे नेते अखिलेश यादव व मायावती यांनी जाहीर सभा घेतल्या.या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार असल्याने यावर सर्व देशाचे लक्ष लागले आहे. चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार असल्याने यावर सर्व देशाचे लक्ष लागले आहे.